जिल्हा वार्षिक योजनांच्या कामांना गती; अपूर्ण प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश…

सिंधुदुर्गनगरी, दि. ०८ (जिमाका)

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) योजनेची आढावा बैठक पार पडली. विकासकामांची गुणवत्ता, निधीचा प्रभावी वापर आणि योजनांची वेळेत पूर्तता यावर भर देत जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

बैठकीत जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील विविध योजनांचा योजना निहाय तसेच कामनिहाय सविस्तर आढावा घेतला. प्रलंबित व अपूर्ण कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करून दायित्व निधी मागणी करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. विकासकामांमध्ये कोणताही विलंब होऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हा परिषद सिंधुदुर्गमार्फत विविध योजनांतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेताना जिल्हाधिकाऱ्यांनी ही कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने आणि निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

नगर विकास विभागांतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेताना जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांना कामांच्या गतीत वाढ करून प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. शहरी भागातील पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी आणि नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकासकामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी सर्व विभागांनी आगामी वर्षासाठी योजनांचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, जेणेकरून विकास प्रक्रियेला अधिक वेग देता येईल, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. तसेच अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कामांचा सविस्तर आढावा घेऊन निधीचा उद्देशपूर्ण वापर आणि लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्याबाबत मार्गदर्शन केले.

जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या ‘सिंधुरत्न समृद्ध योजना’ अंतर्गत सुरू असलेल्या कामांचाही त्यांनी आढावा घेतला. ही कामे प्राधान्याने पूर्ण करून नागरिकांना त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

बैठकीच्या प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले यांनी विविध योजनांची प्रगती, निधी खर्च, प्रलंबित कामे आणि आगामी नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली.

या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!